पायात दागिना कशाला?

Date: 
रवि, 29 जाने 2012

हे सर्व अनुभवसिध्द मन:सामर्थ्य आहे आणि ते मृत्यूभयासही लागू आहे. म्हणून श्रीरामदास सांगत आहेत की, ‘हे शौर्यप्रतीक मृत्यूभयातही तुला धीर देईल. ‘ ज्या लोकांनी हे शौर्यप्रतीक जवळ केले त्यांना निर्भयतेचा नेमस्त निरपवाद अनुभव आहे. कारण रामचैतन्यालासुध्दा आपल्यावर विश्वासणाऱ्या भक्तांचा अभिमान आहेच.
गेल्या श्लोकापासून पुढील दहा श्लोकांपर्यंत रामावरचा विश्वास प्रत्येक श्लोकाच्या कडव्यापर्यंत दाखविला आहे. या प्रत्येक श्लोकाचे चौथे कडवे सांगते, “ आपल्यावर विश्वास असलेल्या भक्ताची राम कधीही उपेक्षा करणार नाही. “ ही गोष्ट मनावर ठसावी म्हणून रामचरित्रातील अनेक घटनांचा आधार घेतला आहे. यापैकी या श्लोकात सबंध अयोध्यापुरीलाच श्रीरामाने विमानातून नेऊन परमोच्च स्थिती दिली, असा दाखला दिला आहे.
त्याआधीच्या श्लोकाच्या पहिल्या चरणात संागितले आहे की, रामाचे ब्रीदच असे की, आपल्यावर विश्वास असणारांचे रक्षण करावयाचे. येथील ‘पदीं ब्रीद गाजे’ याचा अर्थ पायात असलेले तोडर रूमझुम वाजतात असा काहीजणांनी दिलेला आढळतो. पुढे बेचाळिसाव्या श्लोकात ‘तोडरी ब्रीद गाजे’ येथे ब्रीदाला तोडर जोडलेले आहे, असा उल्लेख आहे.
तोडर (तोरड्या) हा पायात घालण्याचा एक अलंकार. त्याचा रुमझुम आवाज होतो, म्हणून श्रीरामाचा महिमा गाजतो, हा थोडा दूरान्वयाचा अर्थ दिसतो. कदाचित तो प्रतीकात्मक असावा. अंधारात मनुष्य काठी ठकठक करीत चालतो; त्याच्या आवाजाने वाटेतले जीवजीवाणू बाजूला होण्यास मदत होते. पायातल्या आवाजाचा काहीसा तसाच उपयोग संभवनीय दिसतो. उपद्रव देऊ शकणारे जीव क्षुद्र असताना त्यांना विनाकारण मारावयास नको, असा श्रीरामासारखा समर्थ पुरूष विचार करीत असणार, तेव्हा ‘पदी ब्रीद गाजे’ या प्रतीकापुरता अर्थ तोडरला जोडावा. पण संकुलार्थाने असे म्हणावे की, रामाच्या पावलापावलात त्याचे ब्रीद, स्वभावगुण उमटतात.
ते कोणते? तर दुसऱ्या ओळीत म्हटल्याप्रमाणे भक्तांचे जे शत्रू त्यांना आपल्या बलवान धनुष्यकांबीने मस्तकछेदनाचे शासन देण्याचे. आता श्रीरामाच्या भक्तांना शत्रू कोण, तिकडे तिसावा श्लोक वळला आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView