अहंकाराने आत्महत्या

Date: 
Sun, 3 Aug 2014

नको रे मना वाद हा खेदकारी।
नको रे मना भेद नाना विकारी।
नको रे मना सीकऊं पूढिलांसि।
अहंभाव जो राहिला तूजपासी।।160।।

गेले तीन श्र्लोकांत वरवरचे ज्ञान आणि सूक्ष्म ज्ञान ह्यातला फरक सांगितला आहे. हा श्र्लोक मागले आणि पुढले श्र्लेाक यांचा धागा जुळवणारे ठिकाण आहे.

या श्र्लोकाची तिसरी ओळ सांगते की, तू लोकांना शिकवायला जाऊ नकोस. पण श्रीरामदासांनी असे म्हटले आहे की, ‘जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी शिकवावे। शहाणे करून सोडवे। सकळ जन।।’ या परस्परविरोधाची संगती मागल्या तीन श्र्लोकांचा अर्थ लावला आहे, तेथे होते.
एकशे सत्तावन्नाव्या श्र्लोकात, निरनिराळ्या शास्त्रकारांत वाद झाले ते बरे नव्हे, असे म्हटले आहे. याच अर्थाने ह्या श्र्लोकाच्या पहिल्या दोन ओळी वादाचे खोटेपण सांगतात. श्रीरामदास वादापेक्षा संवादावर अधिक भर देतात, हे आपण एकशे आठ ते एकशे बारा ह्या श्र्लोक-पंचकाच्या चौथ्या अॆळीत पाहिले आहे. ज्ञान सूक्ष्म असावे, वाद अवश्य करावे, पण अखेर त्यातून ‘सम’ निर्माण व्हावे. ते वाद संवाद ठरावे असा श्रीरामदासांचा अभिप्राय आहे. सारांश अर्धवट ज्ञानाच्या घमेंडीपासून मनाला सावध राहाण्याच इशारा या श्र्लोकात श्रीरामदास देत आहेत.

एकशे एकोणसाठ श्र्लोकापर्यंत मन आणि ब्रह्म यांचा संबंध सांगितल्यावर हे तीन श्र्लोक मनाला ब्रह्माकडे जाण्यासाठी वळवणारे आहेत. ब्रह्माची जिज्ञासा होणे, हे एक भाग्य असते. त्यासाठी अभ्यास करणे, हे दुसरे भाग्य असते. या अभ्यासामुळे जो अहंकार येतो, त्यात न सापडणे हे तिसरे भाग्य असते. ही तिन्ही तऱ्हेची भाग्ये प्राप्त होण्यापूर्वी दुसऱ्याला शिकवीत बसणे म्हणजे अहंकारामुळे केलेली आत्महत्या. अशी दुर्दैवाची परिस्थिती येऊ नये. पण ज्ञानाचा अहंकार झाला म्हणजे विंचवासारखी अवस्था होते. त्याचे वर्णन पुढील श्र्लोकात.

मनोबोधाचे ओवीरूप
स्त्री देखोन आनंदली। म्हणे आमुची दैन्य फिटली।
तवं येरें दिधली। गांठोडी हाती।
सकळांस आनंद जाला। म्हणती आमुचा वडील आला।
तेणें तरी आम्हांला। आंग्या टोप्या आणिल्या।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView