आंबा आणि आत्मा

Date: 
Sun, 7 Aug 2011

आंबा आणि आत्मा
मना वासना दुष्ट कामा नये रे।
मना सर्वथा पापबुध्दी नको रे।
मना धर्मता नीति सोडू नको हो।
मना अंतरी सार वीचार राहो।।4।।
चौथा श्लोक मनाच्या विविध स्वरूपांकडे वळला आहे. पहिल्या ओळीत मनाचा उल्लेख आहे. दुसऱ्या ओळीत बुध्दीचा उल्लेख आहे. तिसऱ्या ओळीत नीतीचा म्हणजे मन:शुध्दीचा उल्लेख आहे. चौथ्या ओळीत आत्म्याचा उल्लेख ‘अंतरी’ या शब्दाने आहे. आणि परमात्म्याचा उल्लेख ‘शाश्वत सत्य’ या अर्थाने आहे.
एका शेतकऱ्याच्या घरी एक साधू उतरला. शेतकऱ्याला बुध्दी, मन, आत्मा, परमात्मा या शब्दाबद्दल उत्सुकताही होती आणि घोटाळाही होता.
साधूने शांतपणे समजावून सांगितले, “तुझा मुलगा तापाने आजारी आहे. त्याने सकाळी आंब्यासाठी हट्ट धरला होता, तो हट्ट म्हणजे वासना बुध्दी. तो आंबा मिळत नाही म्हणून त्याने भोकाड पसरले, ते त्या मुलाच्या ‘मनाने’ पसरले. तू त्याला ‘तापात आंबा खाऊ नये’ हे सांगत होतास. तुझ्या पोटात तुटत होते, हा सगळा नीतीधर्माचा ‘मना’कडून ‘आत्म्या’कडे जाण्याचा प्रयत्न होता. तेवढ्यात तुझ्या मुलाचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या आजोबांच्या फोटोकडे गेले. त्या मुलाला आपल्या मृत आजोबांचे प्रेम आठवले. फोटोतील डोळ्यंाची भीती आठवली. फोटो स्वत: काही बोलला नाही. पण मुलगा शांत झाला. असा अबोल पण परिणामकारक आत्मा असतो. तुझा मुलगा नेहमी शहाण्यासारखा वागला, तुही तुझे आजच्यासारखे कर्तव्य केलेस, म्हणजे तुझ्या बेचाळीस पिढ्यांचे कल्याण होईल. हा परमात्म्याच्या पातळीवरचा विचार झाला. “
शेतकऱ्याला सोप्या शब्दात पुष्कळच समजल्यासारखे वाटले. मनाच्या चौथ्या श्लोकात रामदासांनी मनालाच बुध्दी, मन, आत्मा, परमात्मा या चार पातळ्यांवर उपदेश केला आहे.
मानस ज्ञानेश्र्वर
(‘संसारसौख्य ‘ मंत्र या साधनेसाठी अध्याय 7 श्लोक 21ची मंत्रसंलग्न ओवी लेखकाच्या तळटीपेतील निवेदनाप्रमाणे.)

पै जो जिये देवतांतरी। भजावयाची चाड करी।
तयाची ते चाड पुरी। पुरविता मी।।43।।
जो जो असा भक्त, ज्या ज्या देवतेच्या भजनाची आवड धरतो, त्याची त्याची आवड मीच पूर्ण करतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView