आत आणि बाहेर

Date: 
Sun, 8 Feb 2015
भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे। परी सर्व ही सस्वरूपी न साहे। मना भासलें सर्व कांही पहावें। परी संग सोडूनि सूखी रहावें।।187।। एक मजेदार कोडे पडते. ब्रह्म हे सर्वत्र भरून राहिले ओ, तर मग ते बाहेर का दिसत नाही? माझ्यासमोर एक जांभळा दगड पडला आहे, त्यात ते का दिसत नाही? वास्तविक आपण वारंवार पाहिल्याप्रमाणे, हा गृहीत प्रश्र्नच चूक आहे, म्हणून हा सगळा घोटाळा होतो. आपण एखादी जांभळी वस्तू पाहतो म्हणजे काय होते? विज्ञानाच्या भाषेत त्या वस्तूकडून बेचाळीस अँगस्ट्रॉंम्स तरंग लांबी असलेली शक्ती आपल्या डोळ्यापर्यंत पोचते. दुसऱ्या भाषेत वर्णन करायचे तर, वास्तविक जांभळी वस्तू आपण अशा वस्तूला म्हणतो, की जी वस्तू जांभळ्या रंगाची तरंगशक्ती बाहेर फेकून देते आणि उरलेली शक्ती आत घेते. याहीपेक्षा सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे, जी वस्तू मुळीच जांभळी नसते, तिलाच आपण जांभळी म्हणत असतो. वास्तविक ती वस्तू तर ‘जांभळेपणा’बाहेर फेकून देत असते. याचा अर्थ असा की, साध्या जांभळ्या वस्तूतील सत्य तुम्हाला पाहायचे असेल, तर ते तुम्हाला बाहेरून समजणार नाही. उलट आत त्या वस्तूच्या पोटात तुम्ही कसे शिरणार? याचा अर्थ ब्रह्माचे सत्य स्वरूप सत्यतेने पहायचे असेले तर दुसऱ्या कुठल्या वस्तूच्या ऐवजी स्वत:च्या आत शिरण्याचा उपदेश ज्ञाते करतात. आणि पुढे सांगतात, एकदा तुम्हाला स्वत:च्या ‘आतले’ सापडले की, ब्रह्म हाती आले. कारण सत्यमय ब्रह्मामध्ये आत आणि बाहेर असे काही नाही. तेच या श्र्लोकाच्या पहिल्या ओळीत म्हटले आहे की, पिंड ब्रह्मांडाचे ऐक्य आहे. आपण ते स्वत:च्या स्वरूपात पहात नाही. ही आपली चूक आहे. तिसरी ओळ संागते की, मनाचे बाहेरचे भास पाहावेत. पण चौथी ओळ संागते की, त्या भासात न अडकता, स्वयंसुख शोधावे. या पुढल्या चार श्र्लोकांची चौथी ओळ सारखीच आहे. त्याचे विवेचन पुढील श्र्लोक विवेचनात. मनोबोधाचे ओवीरूप आतां कासया रडावें। प्राप्त होते ते भोगावें।। ऐसें बोलोनियां जीवें। धारिष्ट केलें। ऐसा दु:खे गदगदला। मग विदेशाप्रती गेला। पुढे प्रसंग वर्तला। तो सावध ऐका।।