एका दगडात तीन पक्षी!

Date: 
Sun, 24 Aug 2014
देहेबुधिचा निश्र्चयो दृढ जाला। देहातीत तें हीत सांडीत गेला। देहेंबुधित ते आत्ममुधी करावी। सदा संगती सज्जनांची धरावी।।163।। एकशे त्रेसष्टपासून पुढल्या दहा श्र्लोकांची चौथी ओळ तीच आहे. या दहा श्र्लोकांचे वैशिष्ट्य तीन प्रकारचे आहे. एकशे सत्तेचाळीस श्र्लोकापासून, आत्तापर्यंत ब्रह्मविज्ञान संागून झाले. ब्रह्म आणि मन यांचा संबंध सांगून झाला. आता हे येथे दहा श्र्लोक देह आणि मन यांचा संबंध सांगणार आहेत.या दहा श्र्लोकांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, हे श्र्लोक मनाच्या दुर्गुणावर उपाय कोणता करावा ते ठरवतात. आणि तिसरे वैशिष्ट्य असे की, तो उपाय धर्म आणि समाजहित या दोन्हीचा मेळ घालणारा आहे. कारण तो प्रत्येक चौथ्या ओळीत सज्जन संगती सुचवितो. दुसऱ्याचे कल्याण करणाऱ्या माणसाच्या संगतीत तुम्ही गेलात, म्हणजे साहजिक तुम्ही सुध्दा ते नियम सहजतेने पाळू शकाल. तुमचे कल्याण होईल. दासबोधाच्या सातव्या दशकात पहिल्या समासात अखेरच्या ओव्यातसुध्दा चांगल्या माणसाच्या सहवासातले फायदे समर्थ सांगतात. सुरुवातीलचा हा श्र्लोक माणसाची चूक त्याच्या हातात देतो. माणूस हा स्वत:ला फक्त देहरूप समजतो आणि त्याचेच कोडकौतुक करीत बसतो. देहपलिकडे जे आत्महित ते करून घेण्यासाठी सज्जन हा उपयोगी पडेल. श्रीरामदास केवढा थोर उपदेश करीत आहेत, ते पहा. देहबुध्दी सोडायची म्हणजे कोठेतरी नाक धरून बसायचे, असे रामदास सांगत नाहीत; तर सज्जनाच्या म्हणजे दुसऱ्याच्या संगतीत जावयास सांगतात. त्याने एका दगडात तीन पक्षी मरतात. एक देहबुध्दि ही आत्मबुध्दी होते, मनशुध्दी होत आणि तीन समाजहित साधते. मानस ज्ञानेश्र्वर (‘चिंतामुक्ती मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 9, श्र्लोक 10 ची मंत्रंसलग्न ओवी. लेखकाच्या निवेदनातील तळटीपेप्रमाणे.) हे सर्वच आमुचे गूढ। परि दाविले तुज उघड। आता इंद्रिया देऊनि कवाड।हृदय भोगी।।135।। अर्थ: हे गूढ ज्ञान आमचे सारसर्वस्व आहे, ते तुला आज उघड करून सांगिलते आहे, तर आता भटकणाऱ्या इंद्रियांची दारे बंद करून आपल्या अंतरंगात आत्मचिंतनाने या रहस्याच्या गोडीचा तू उपभोग घे.