एका वेड्याची गोष्ट

Date: 
Sun, 1 Feb 2015
एका वेड्याची गोष्ट सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधून पाहे। अखंडीत भेटी रघूराजयोगु। मना सांडि रे मीपणाचा वियोगु।।186।। एका वेड्याच्या इस्पितळातल्या एका वेड्याची गोष्ट आहे. स्वत:च्या खिशात घातलेला डावा हात, तो उजव्या हाताने पकडे आणि मोठमोठ्याने ओरडे, “चोर, चोर! धावा धावा. पकडा” वास्तविक त्याचा एक हात चोर होता आणि दुसरा राव होता. एकशे बहात्तराव्या श्र्लोकात, मनातले शुध्द आणि अशुध्द असे प्रवाह आपण पाहिले आहेत. राम आपल्या अंत:करणात आहे. तर मग तो आपल्याला दिसत का नाही? याचे उत्तर मोठे गमतीचे आहे. “राम मला भेटत का नाही? “ ह्या प्रश्र्नात तुम्ही राम गमावलेला असतो. कारण प्रश्र्नामध्ये तुम्ही असे गृहीत धरून विचारता की, तुम्ही व राम हे निरनिराळे आहेत. पण सत्य असे आहे की, तुम्ही आणि राम हे भिन्न नाहीत. त्यामुळे, जोपर्यंत हा प्रश्र्न तुमच्या मनात ठाण मांडून बसलेला असेल, तोपर्यंत रामाची आणि तुमची भेट होणार नाही. तेव्हा तुमच्या सज्जन मनाला आवाहन करून श्रीरामदास म्हणत आहेत की, राम तर तुमच्या सन्निधच आहे. तिसऱ्या ओळीत ते स्पष्ट करून सांगतात की, रामाची आणि तुमची भेट अखंडितपणे चालू आहे. आणि चौथी ओळ सांगते की, या भेटीत जो काहीसा व्यत्यय येतो आहे, तो तुमच्या स्वत:च्याच प्रश्र्नाचा. तुम्ही आणि राम निरनिराळे आहात, असे भासण्यामुळे तुमचा आणि रामाचा वियोग होतो आहे. “रामापासून ‘मी‘ भिन्न आहे” या वाक्यातला जो ‘मी’ आहे तो खरा अडथळा आहे. भक्त याचा अर्थ जो विभक्त नाही तो. स्वत:च्या रूपापासून तुम्ही राम विभक्त करू इच्छिता, हे तुम्हाला कळत न कळत घडत असेल पण ते अज्ञान आहे हे निश्र्चित. शांत, एकाग्र मनाने सगळ्या प्रश्र्नांचा लय करून मनास पहावे. म्हणजे रामाशी एकतेचा योग येईल. मनोबोधाचे ओवीरूप मागील दु:ख आठवलें। जें जें होते प्राप्त जालें। मग रुदन आरंभिलें। दीर्घ स्वरें।। आरण्यरुदन करितां। कोणी नाही बुझाविता। मग होये विचारिता। आपुले मनीं।।