एका शब्दाचे दोन अर्थ

Date: 
Sun, 1 Jan 2012
मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैचा।। सुखाची घडी लोटता सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे।।25।। या श्लोकातील ‘बोलण्याचे’ या शब्दाचे दोन अर्थ समर्थभक्त श्री.देव देतात. एक अर्थ म्हणजे श्रीरामदास हा जो उपदेश करीत आहेत, त्याचा कंटाळा करू नको. दुसरा अर्थ, रामनाम उच्चारण्याचा कंटाळा करू नको; यापैकी पहिला अर्थ तितकासा संयुक्तिक वाटत नाही. ज्याला खुद्द रामदासच्याच उपदेशाचा किंवा बोलण्याचा कंटाळा येईल, तो मनुष्य चोविसावा श्लोक संपल्यावर श्रवण किंवा पुस्तक बाजूला ठेवील आणि पंचविसाव्या श्लोकापर्यंत पोचणारच नाही. म्हणून या श्लोकातील बोलणे हे चोविसाव्या श्र्लोकातील रामनामाच्या उच्चाराशी संबंधित आहे. तेथे ‘रामउच्चाराचा शीण मानू नको, इतर गोष्टीचा शीण मान’ असे म्हटले आहे. त्याचीच पुनरुक्ती किंवा जुळवणूक ‘वीट’ या शब्दाने येथे केली आहे. यातील तिसऱ्या ओळीचा अर्थ करताना, “काळ सुखात चालला असतो ते सुख होते खरे” अशी टिप्पणी श्री.देव देतात पण ‘लोटता’ या शब्दाचा अर्थ लोटल्यावर असा होतो. सुखाची घडी लोटल्यावर सुख कसे होणार? तेव्हा ‘सुखाची संधि लोटून दिली, नाकारली, तरच सुख आहे. असा दुसरा अर्थ केल्यास चालू शकेल. कारण सुखाची घडी स्वीकारली तरी, चौथ्या ओळीत म्हटल्याप्रमाणे त्या घडीचे सुखपण संपून जाणार आहे. ते सुख शिल्लक उरणार नाही. सुखाचे क्षणभंगूरत्व चौथ्या ओळीत स्पष्ट आहे. म्हणून तिसऱ्या ओळीचा अर्थ, असे हे क्षणभंगूर सुख नाकारण्यातच सुख आहे असा करणे अधिक शोभून दिसेल. शब्दांचे अर्थ मनाचा निश्चय करण्यासाठी. जेवढे अनुभव सत्याच्या अनुकूल असतील, तेवढे मन पक्के होत जाते. म्हणून सूक्ष्म विश्लषण करावयाचे. मनाचे ‘अभंग’ रूप देवाचिये पायी देई मना बुडी। नको ध्यावो वोढी इंद्रियांचे।।1।।।धृ।। सर्व सुखे तेथे होती एक वेळे। न सरे काळे कल्पांती ही।।2।। जाणे येणे खुंटे धावे वेरजार। न लगे डोंगर उसंतावे।।3।। संागणे ते तुज इतुले चि आता। मानी धन कांता विषतुल्य।।4।। तुका म्हणे तुझे होती उपकार। उतरो हा पार भवसिंधु।।5।।