कुंपणावरचा ‘तो’प्राणी...

Date: 
Sun, 13 Jul 2014
बहू शास्त्र धुंडालितां वाड आहे। जया निश्र्चयो येक तो ही न साहे। मती भांडती शास्त्रबोधे विरोधें। गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधें।।157।। एक मठ होता. एक दिवस त्या मठात एक विद्वान पाहुण राहण्यास आला. दरवाज्याजवळ कुंपणावर त्याने एक तांबडा प्राणी पाहिला. नंतर काही दिवसांनी दुसरा पाहुणा आला. त्यांनी हिरवा प्राणी पाहिला. पुन्हा काही दिवसांनी आणखी एक पाहुणा आला. त्यांने कुंपणावर पाहिले तर एक निळसर प्राणी होता. हे तिघे विद्वान मठात एकदा सहज बोलावयास बसले. कुंपणावरच्या प्राण्याचा उल्लेख निघताच प्रत्येकाने आपापला रंग सांगितला आणि प्रत्येकजण भांडू लागला की आपलेच खरे आहे. भांडण एवढे वाढले की, तेथे रखवालदार धावत आला आणि भांडणाचे कारण कळल्यावर तो हसत म्हणाला, “तुमचे तिघांचेही म्हणणे खरे आहे आणि खोटे आहे. “ हे ऐकल्यावर तिघेही एक झाले आणि त्या रखवालदाराशी भांडू लागले. तेव्हा रखवालदाराने शांतपणे सांगितले, “बाबांनो तुम्ही पाहिला तो सरडा होता. तो आपले रंग बदलतो. त्याचा खरा रंग कोणी पाहिला आहे? सगळे रंग हे त्याचेच रंग आहेत. “ श्रीरामदास म्हणतात की शस्त्र वरवर पाहिले तर तुमचा एकही निश्र्चय होणार नाही. निरनिराळ्या मतांची तेथे भांडणे तुम्हाला दिसतील. पण चौथ्या ओळीत समर्थ उपाय सुुचवितात की, या सगळ्यामुळे तुमचे मन कुंठित झाले म्हणजे ज्ञानबोधाकडे वळा आणि कोणी वरवरच्या ज्ञानापासशी थांबू नका. म्हणून श्रीरामदास शेवटला शब्द जोडीत आहेत- ‘प्रबोधे’ . प्रचंड बोध, सूक्ष्म बुध्दी. वरवरच्या विरोधाच्या पलीकडे सूक्ष्मबुध्दीच मार्ग दाखवील. मनोबोधाचे ओवीरूप ऐसें रुण उदंड जालें। रिणाइती वेढून घेतलें। मग प्रयाण आरंभिले। विदेशाप्रती।। दोनी वरुषें बुडी मारिली। नीच सेवा आंगिकारिली। शरीरें आपदा भोगिली। अतिशयेंसी।।