जुनेपणात ‘ही ‘शक्ती असते...

Date: 
Sun, 3 May 2015
अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे। तेथे तर्क संपर्क तो ही न साहे। अती गूढ ते दृश्य तत्काळ सोंपे। दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापें।।199।। जुन्यात शक्ती असते असा या श्र्लोकाचा अर्थ सरळ आहे. रामरूपी ब्रह्माचे स्वरूप अत्यंत जुने आहे, भव्य आहे, याबद्दल तर्काला वाव नाही. ते गूढ तरी दृढ निश्र्चयाने समजून घेतले, तर ते सोपे आहे. आणि त्याची खूण एवढीच की, त्याच्यासारखे दुसरे काही नाही. ते स्वयंपूर्ण एकच आहे. एकच श्रेष्ठप्रतापी आहे. म्हणजे पटण्यासारखी खूण विचाराल तर ‘तशी खूण सांगता येणार नाही हीच खूण, ‘ असे हे नकारी बोलणे बोलावे लागते. अशा जुन्या आणि प्राचीन व्यक्तीत सामर्थ्य होते की नाही, याची शंका आजच्या शंकेखोरला पुष्कळदा येत राहते. ‘ऑन द ट्रॅक ऑफ डिस्कव्हरी ‘ ग्रंथ क्र.2 (संदर्भ ग्रंथी 29टी ) यामध्ये पान एकशे ऐंशीवर प्राचीन व्यक्तीला असलेल्या विशेष शक्तीची माहिती दिली आहे. हे नास्तिक लेखकाचेच पुस्तक आहे. “सायकॉलॉजिकल रिसर्चेस् ऑफ यू.एस.एस.आर “ (संदर्भ 34टी) पान एकशे एक्याऐंशीवर नास्तिकांनीही जुन्याचे शहाणपण मानलेले दिसते. “सायकॉलॉजी ऍज यू मे लाइक इट “ मध्ये तर (संदर्भ ग्रंथ तीस टी, पान त्रेचाळीस) लेनिनग्राड येथे चाललेल्या प्रयोगांचा उल्लेखच आहे. व्हसिलिव्हच्या मताप्रमाणे दुरून माणसावर परिणाम घडवून आणण्याची शक्ती होती. अर्थात थोर व्यक्तींना ती शक्ती अधिक असावी आणि आज ती अशक्य वाटावी, हे सरळच आहे. त्याच पुस्तकाच्या पान बेचाळीसवर अशी व्यक्ती आजही क्वचित् प्रकट होऊ शकते, असे विधान लाजारेव्ह व त्याच्या सहकाऱ्यांनी केले आहे. खरे म्हटले तर प्रत्येकाच्याच मनाची ताकद पृथ्वीला पालांडा घालण्याएवढी असते. सर्वश्रेष्ठ श्रेष्ठी, ती आत्मविश्र्वासाने वापरतो आणि एकमेवाद्वितीय होतो. मनोबोधाचे ओवीरूप बापलेंका भांडण जालें। लेकी बापास मारिलें। तव ते मातेनें घेतलें। शंखतीर्थ।। ऐकोनि मिळाले लोक। उभे पाहाती कौतुक। म्हणती बापास लेक। कामा आले।।