डोळा, ब्रह्म, काच आणि पाणी

Date: 
Sun, 29 Jun 2014
दिसेना जीन तेचि शोधूनि पाहे। बरें पाहता गूज तेथेंचि आहे। करी घउं जाता कदा आडळेना। जनीं सर्व कोंदाटले ते कळेना।।155।। ब्रह्माच्या शोधात असलेला मनुष्य सत्याचा पुरावा मागतो आणि म्हणतो की, माला ब्रह्म डोळ्यांनी दाखवा. आता हे ब्रह्म डोळ्यांना दाखवायचे कसे? एखाद्या माणसाच्या चष्म्याचा नंबर एक आहे, पण आणखी दहा वर्षांनी तो नंबर चारसुध्दा होऊ शकतो. आता हा माणूस हटून बसला की माझ्याजवळ एक नंबरचा चष्मा आहे, त्यानेच समोरच्या पुस्तकातले अक्षर मला वाचता आले पाहिजे; तर अशा हट्टाने काय होईल? आपल्या जवळ असलेल्या साधनाने आपल्याला सर्व काही समजले पाहिजे, हा माणसाचा हट्ट आहे, अहंकार आहे. जर अपरोक्ष ज्ञानाने, अप्रत्यक्ष सिध्दांताने एखादे प्रमेय सिध्द झाले, तर त्याचे प्रत्यक्ष ज्ञान वाढविण्यासाठी तुमचे साधन मोठे करणे हाच मार्ग आहे. लहानपणाची चड्डीसुध्दा वाढत्या वयात चालत नाही. सुरुवातीचा चष्मा नंतर चालतोच असे नाही. मग उच्च जिज्ञासेला उच्च अभ्यास का नको? म्हणूनच श्रीरामदास म्हणत आहेत की, डोळा हे प्राथमिक साधन आहे आणि ब्रह्म हे अति उच्च सत्य आहे. तेव्हा ब्रह्म जे ‘जनी’ म्हणजे सामान्य लोकांमध्ये, सामान्य साधनाने कळले नाही तर ते ‘बरे’ म्हणजे अधिक बऱ्या अभ्यासाने पहावे. ते ‘करी’ म्हणजे हातात घेऊन पाहण्याची इच्छा करील, तर केव्हाही सापडणार नाही. एखादा काचेचा तुकडा अगदी शुध्द स्थितीमध्ये तुम्ही निर्मल पाण्यात टाकाल आणि तो काठोकाठ पसरलेला असेल, तर त्याचे अस्तित्व पाहाणाऱ्याच्या डोळ्यांनी भासणार नाही. पाणी आणि काच यांचे निराळेपण तेथे संपलेले असते आणि म्हणून ते डोळ्यांच्या साधनांनी तरी पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरतो. त्यापेक्षाही सूक्ष्म आणि शुध्द पाहारणाऱ्याशीच एकरूप असलेले, जगभर पसरलेले ब्रह्म तुम्हाला सहजासहजी वरवर दिसणार नाही. मनोबोधाचे ओवीरूप आपण खातों अन्नासी। अन्न खातें आपणासी। सर्वकाळ मानसीं। चिंतातुर।। पती अवघीची मोडली। वस्तभाव गाहाण पडिली। अहा देवा वेळ आली। आतां दिवाळ्याची।।