देवभक्ताला संकटे का?

Date: 
Sun, 18 Mar 2012

देवभक्ताला संकटे का?
सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे।।
सुखानंद आनंद कैवल्यदानी।
नुपेक्षी कदा राम दासाभिनामी।।36।।
देवशक्ती मिळवण्याचे दोन सुंदर मार्ग तुळसीदासजीनंी सांगितले आहेत. तुळसीदासजी म्हणतात, एक तर तू रामावर प्रेम कर. नाही तर रामाला तुझ्यावर प्रेम करू दे. रामाचे प्रेम तुझ्यावर जडण्यासाठी रामाला प्रिय असे लोककल्याणाचे काम तुम्ही करायला पाहिजे. कारण रामाचा अवतार तर तेवढ्यासाठीच झाला आहे. लोककल्याणाची कामे करताना संकटे येतील. पण ती रामावर काय कमी आली? तेव्हा ‘रामभक्तीने रामसामर्थ्य’ हीच युक्ती खरी.
पस्तिसाव्या श्लोकात तुम्ही प्रभुमय भाव ठेवल्यामुळे तुम्हाला प्रभुकृपा सामर्थ्य प्राप्त होईल, असे समर्थ म्हणतात. मग तुम्ही विचारता,
‘देव आहे तरी कोठे? ‘ छत्तिसावा श्लोक सांगतो, ‘देव तर तुमच्या जवळच आहे. ‘ आता जर तो जवळ आहे, तर संकटे कशी ओढवतात, असा माणसाला प्रश्न पडतो. म्हणून पुन:पुन्हा खुद्द रामावरच संकटे आली, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावयाची. त्या संकटांना रामाने समर्थपणाने तोंड दिले. रामावर विश्वास ठेवला, तर ती समर्थता तुमच्याही सन्निध येईल. या श्लोकाची दुसरी ओळ लगेच सांगते, “राम सन्निध असताना संकटे आली, तर ती रामाची कृपाच समजा. “

पण माणूस मोठा चमत्कारिक आहे. वडील जोपर्यंत मुलाला उत्तम खायला प्यायला देतात तोपर्यंत चांगले. पण ते आजारी पडले, तर लगेच मुलाला ते संकट वाटते. रामदासांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठी अंगठ्याला आंबा बांधून पू झाल्याचा पुकारा केला. शिष्यांना त्यांनी सांगितले, यातला पू कोणी तरी पिऊन चोखा. एकटा कल्याण पुढे आला. त्याला पू मधुर लागला आणि समर्थकृपाही कल्याणप्रद झाली. कसोटी पाहण्यासाठी संकटे येत असतात. आणि कसोटी ही सोन्याची घेतली जाते,
तांब्या-पितळेची नाही. यासाठीच संकटाच्या सान्निध्याने देवाची शंका न घेतली, तर सुखानंदाने कैवल्यच अशा एकनिष्ठापुढे येते.
मानस ज्ञानेश्र्वर
(‘आप्तवियोग शांती’मंत्र या साधनेसाठी अ.8 श्लो.1 मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
मग अर्जुने म्हणितले। हा हो जी अवधारिले।
जे म्या पुसिले। ते निरूपिजो।।1।।
अर्थ: मग अर्जुन म्हणाला, “देवा, आता माझे लक्ष आहे. जे मी विचारले आहे ते आता मला सांगावे. “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView