नातेवाईक वाईट का?

Date: 
Sun, 14 Sep 2014

अहंकार विस्तारला या देहाचा।
स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा।
बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी।।166।।

गेल्या दोन श्र्लोकांच्या निमित्ताने सांगितलेली आणि एकशे अठ्ठावन्नाव्या श्र्लोकाच्या संदर्भाचा धागा असलेली कथा किती सुसंबध्द आहे, हे या श्र्लोकाच्या बळकटपणाने सांगितले आहे. या श्र्लोकात श्रीरामदासांची शिकवण मोह, भ्रम आणि चिंता सोडावी अशी आहे. देहाच्या अहंकाराचा विस्तार होतो आणि स्त्री, पुत्र, मित्र, आणि इतर गणगोत यांचा माणसाला मोह पडतो.

या भ्रमातून सुटले तर जन्ममरणाची चिंता नाहीशी करता येईल. हा सगळा उपदेश शेषान तंतोतंत पाळला. नातेवाईक हाकलले. देहकष्ट केले. जन्ममरणाची चिंता न धरता तप केले. गरुडासारख्या सज्जनांची संगत धरली आणि त्यामुळे शेवटी पृथ्वीचा भार माथ्यावर धारण करण्याइतके पृथ्वीमोलाचे सत् त्याने माथ्यावर घेतले. जणू काही आकाशात गरुड आणि पृथ्वीखाली शेषशायी या दोन सत्सूत्रीची जोडी सत्संगतीचे आर्दश होऊन राहिले आहेत.

दासबोधात तिसऱ्या दशकात सहाव्या समासात श्र्लोक 53म्हणतो की, शरीरसुध्दा तुझे नाही, तर इतर नातेवाईकांची गोष्ट कशाला? येथे म्हटले आहे, देहाचा अहंकार विस्तारला आहे. वास्तविक मनातला अहंकार देहरूपाने विस्तारला आणि स्वत:च्या देहाबरोबरच इतरांचे देह त्या त्या प्रमाणात मनाने स्वत:च्या मायकक्षेत घेतले. सर्वांचा मोह निर्माण झाला आणि पुन्हा जन्म निर्माण झाला. या सगळ्यांचे मूळ आपल्या अहंकारात आहे. तो जाण्यासाठी सज्जनांची संगती हा उपाय. नातेवाईक वाईट नसतात. त्यांच्याबद्दलचा अहंकार वाईट असतो, हे खरे आहे.

नातेवाईक वाईट म्हटले, तर प्रत्येकजण दुसऱ्या कोणाचाही नातेवाईक असतोच म्हणून या श्र्लोकाचा भर इतर लोक वाईट आहेत असा नसून त्याचा मतलब असा आहे की, आपल्या आतल्या अहंकारामुळे आपण इतरांबद्दलचे मोह वाढवतो. तो मोह कमी करून इतरांची सेवा करावी. कारण सत्संगतीचा परिणाम व्यक्त होतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView