मोठेपणाचा उगम लहानपणातच

Date: 
Sun, 19 Apr 2015
नभासारिखें रूप या राघवाचें। मनी चिंतीता मूळ तुटे भवाचें। तया पाहतां देहबुध्दि उरेना। सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना।।197।। सर्वव्यापी रामाचे रूप 197श्र्लोकात सांगताना श्रीरामदास म्हणतात, ‘आकाशसारखे भव्य असे रामाचे रूप आहे. त्याचे जर मनाने चिंतन केले तर भवभयाचे काही कारण उरत नाही. चिंतन केल्यानंतर देहाची खोटी आसक्ती उरत नाही. आणि त्याची एकदा गोडी लागली की रामचिंतनाची अपार आर्तता पोटात निर्माण होते. ‘ येथे आर्तता याचा अर्थ त्याहीपेक्षा बरा म्हणजे ‘तृप्ती’ असा घ्यावा. रामाला पाहताना पुरेशी तृप्ती होत नाही. रामाचे सामर्थ्य कोठून आले? मुळात हा पूर्णत्वाच पुतळा होताच. पण ह्या अवतारात आल्यावर त्याच्यावर वसिष्ठादिकांनी संस्कार केले. तेही महत्त्वाचे आहेत. योगवासिष्ठामध्ये स्थिती प्रकरण आहे. त्यामध्ये सर्ग एकसष्ट हा वसिष्ठांनी रामाला केलेल्या उपदेशांनी भरलेला आहे. तेथे श्रीवसिष्ठ म्हणतात, “बाह्यत: अत्यंत रमणीय वाटणारे शरीर आणि अहंकार यांचे मिथ्यत्व ओळखून त्यांचा त्याग करावा. आणि ज्या चिन्मात्ररूपी तंतूमध्ये हे मोती ओवले गेले आहेत त्याचे सर्वत्र दर्शन करून घ्यावे. ज्याप्रमाणे सूत्रामध्ये मणी ओवलेले असतात, त्याप्रमाणे या नित्य सर्वगत, सर्वभावित, सर्वव्यापी आणि शिवस्वरूपी परमात्मा तत्वामध्ये हे सर्व जग ओवलेले आहे. “जी शक्ती चित्भुवन कोषात, आकाश व कुहरात, सूर्यमंडळात आणि भूविवरामध्ये व्यापून राहिली आहे, तीच एखाद्या यत्किंचित् कीटकाच्या उदरातही आहे. कारण घरे अनेक असली तरी त्यातील आकाश एकच असते, त्याचप्रमाणे शरीरे अनेक असली आणि त्यांचे आकारही भिन्न भिन्न दिसले, तरी त्यातील चैतन्यात वस्तुत: मुळीच भेद नाही. “ सूक्ष्म आणि प्रचंड अशा रामाच्या विशालतेचे रहस्य वसिष्ठांनी केलेल्या या संस्कारांमध्येही आहे. मनोबोधाचे ओवीरूप पुन्हा विदेशासी गेला। द्रव्य मेळऊन आला। तंव घरी कळहो लागला।सावत्र पुत्रासी। स्त्री जाली न्हातीधुती। पुत्र देखों न सकती। भ्रताराची गेली शक्ती। वृध्द जाला।।