विज्ञानाच्या व्याख्येत देव

Date: 
Sun, 16 Nov 2014
विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी। हरू जाळितो लोक संव्हारकाळी। परी सेवटी शंकरा कोण जाळी।।75।। विधी म्हणजे ब्रह्मदेव. हा ब्रह्मदेव जन्मणाऱ्या बाळाच्या भालावर त्याचे नशिब लिहून ठेवतो. आता प्रश्र्न असा की हा ब्रह्मदेव जन्माला आला तेव्हा त्याच्या भालावर कोणी लिहिले? तिसरी आणि चौथी ह्या दोन ओळी हाच प्रश्र्न श्रीशंकराबद्दल विचारतात. शंकर हे संहारकर्ते मृत्युदेव, म्हणजे सर्वांना जाळणारे ते. पण खुद्द शंकर मेल्यानंतर त्यांना कोण जाळणार? जन्म आणि मृत्यू यांच्या मुख्य देवकल्पनातून हे प्रश्र्न उपस्थित झाले. याच धर्तीवरचा प्रश्र्न श्रीविष्णूबद्दलही विचारता येईल. विष्णू हा जगाचे पालन करतो, पण विष्णूचे पालन कोण करतो? हा प्रश्र्न श्रीरामदासांनी येथे विचारला नसला तरी दासबोधात दशक नऊ, समास पाच, ओवी चोवीसमध्ये श्रीरामदास विचारतात, ‘विष्णूने विश्र्व पाळले। विष्णूस पाळिता कवणु।।’ म्हणजे ज्यांची या सगळ्यावर सत्ता चालते असे आपण म्हणतो, त्यांच्यावर कोणाची सत्ता चालते? असा हा मूलभूत प्रश्र्न श्रीरामदासंनी उपस्थित केला आहे. त्याचे उत्तर पुढे नंतरच्या श्र्लोकात येते. विज्ञानामध्ये अशाच तऱ्हेच्या प्रश्र्नांचे उत्तर मजेदार दिले आहे. कार्ल पिअर्सन, ‘ग्रामर ऑफ सायन्स’मध्ये म्हणतो की, कारणांचे शोध घेत घेत मूळ कारणांकडे जाताना, आपणाला थबकून म्हणावे लागते, ‘हिअर इज फर्स्ट कॉज, हिअर बिगिन्स अवर इग्नरन्स’( येथे आदिकारण सुरू होत, म्हणजे येथे आमचे अज्ञान सुरू होते. ) मनोबोधाचे ओवीरूप आजी जरी ते असती। तरी मजला कदा न विशंभती। वियोग होतां आक्रंदती। ते पोटागि वेगळीच। पुत्र वैभवहीन भिकारी। माता तैसाचि अंगिकारी। दगदगला देखोनि अंतरी। त्याच्या दु:खे दु:खवे।।