संत वागतात कसे?

Date: 
Sun, 28 Sep 2014

करी वृत्ति जो संत तो संत जाणा।
दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा।
उपाधी देहेबुधिते वाढवीते।
परी सज्जना केवि बांधू शके ते।।168।।

मागच्या पाच श्र्लोकांतील चौथी ओळ सत् करणाऱ्यांची म्हणजे संतांची संगती सांगते. असे हे सज्जन किंवा संत वागतात तरी कसे? याचा खुलासा पुढील दोन श्र्लोक करीत आहेत.

सामान्य माणूस म्हणतो की, माझ्यापाठीमागे पोट लागलेले आहे. वास्तविक हा माणूसच पोटामागे लागलेला असतो. हा परस्पर विरोध संत कसा टाळतात? संत हे काही पोटाकडे पाठ फिरवित नाहीत. त्यांनाही पोटाला खावे लागतेच. पण सामान्य मनुष्य खाण्यासाठी जगतो, तर संत हे जगण्यासाठी खातात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, ‘मी भूकच खाऊन टाकलेली आहे. ‘ जन्माच्या कर्मी केव्हा एकदा ज्ञानेश्र्वरांनी मांडे खाण्याचे मनात आणले, तर ते त्यांना मनातच खावे लागले. त्या निमित्ताने मुक्ताबाईचे ताटीचे अभंग वाङ्मयात पक्वान्नापेक्षाही मधुर होऊन राहिले आहेत. भुकेल्या नामदेवाच्या पुढली भाकरी कुत्र्याने पळविली, तर कुत्र्याचे पोट दुखेल म्हणून नामदेव त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन धावले.

जी गोष्ट जिभेच्या आणि पोटाच्या मायेची, तीच गोष्ट इतर लोकांच्या आकांक्षाची. ‘खोटी आकांक्षा बाळगल्यामुळे ज्यांना दीनपणा येत नाही, ते संत ‘ असे श्र्लोकाच्या पहिल्या दोन ओळी संागतात. तिसरी ओळ सांगते की, निरनिराळ्या तऱ्हेच्या आशा, इच्छा मनुष्य भोगतो व त्यामुळे देहावरचे प्रेम वाढत जाते. पण ही गोष्ट सज्जनंाच्या बाबतीत होत नाही. कारण सज्जन मनुष्य या आशांचा विस्तार करण्यासाठी संयम करतो. आपली वृत्ती आपल्या ताब्यात ठेवतो. साहजिकच दुसऱ्याला उपयोगी पडण्यात त्याला फारशी अडचण वाटत नाही. तो ते काम सहजतेने, सततेने, सद्बुध्दीने करतो. म्हणून त्याला संत म्हणायचे.
गीतेच्या दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणे दिली आहेत. ती आणि ब्रह्मशोधक संतांची लक्षणे एकशे सेहेचाळीस ते एकशे बासष्ठपर्यंत ठायी ठायी विखुरलेली आहेत. त्या सर्वांचा व्यावहारिक सारंाश या श्र्लोकांत सादर केला आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
ऐसी वासना सकळांची। अवघी सोइरी सुखाचीं।
स्त्री अत्यंत प्रीतीची। तेही सुखाच लागलीं।
विदेसीं बहु दगदगला। विश्रंाती घ्यावया आला।
स्वासहि नाही टाकिला। तो जाणें वोढवलें।।

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView