‘शिव’ होण्याचे तत्त्व

Cycle of Good Deeds.jpg

महाशिवरात्रीनिमित्त स्वामीजींचा संदेश
शिव म्हणजे चांगला. चांगल्यासाठी मी प्राण देईन.

जो दुसऱ्यावर धोंडा मारील, त्याच्या घरावर धोंडा मारलाच जाईल! मात्र, जो दुसऱ्याच्या घरावर फुले वाहण्यासाठी धडपडेल, त्याच्याकडे फुलांचीच वृष्टी होईल! तुम्ही दुसऱ्यासाठी जे कराल ते तुम्हाला मिळेल. इतकी सोपी गोष्ट आहे. चांगुलपणा उगवेल. आता तो का उगवत नाहीये? कारण पुरेसा चांगुलपणा पेरलेला नाहीये, एवढाच त्याचा अर्थ आहे.

काही लोक विचारतात, सव्वासहा टक्के म्हणजे किती? काही लोक आपले उत्पन्न चोरुन चोरून देत असतात. काही लोक विचारतात की, मग आम्ही प्रोव्हिडंड फंडासकट द्यायचं का? घरी भाडं येते, कोकणात नारळ येतात, त्याच्या सकट द्यायचे का? काय करायच? मी त्यांना सांगतो की, मी काही तुमचा इन्कमटॅक्स ऑफिसर नाही. पण मी नसलो तरी, दुसरं कुणी तरी आहे हे लक्षात ठेवा. तुमच्याच डोक्यात, मेंदूमध्ये तो बसला आहे. तुमच्या मेंदूमध्ये चित्रगुप्त म्हणजे गुप्तचित्र तयार झालं आहे, की तुम्ही खरे बोलता का खोटं बोलता!

तुम्ही संकुचितपणा टाका. तुम्ही शिव आहात, तुम्हीच पार्वती आहात. तुम्हाला कुठे भेद मिळणार नाही. चांगल्या हेतूवर या. शिवसंकल्प करण्यासाठी धडपडलात तर, तुम्हाला भेटायला देवही धडपडेल. तुम्हाला शिव आणि पार्वती दूर ठेवायला इच्छित नाहीत. त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. ते म्हणतात की, ‘मी शुभ करतो आहे, शिव करतो आहे, जगाचे चांगले करायला धडपडतो आहे. तू बरोबर ये ना! आपण सगळे मिळून चांगलं करू. मग शिव आणि तुम्ही एकच झालात.’

चांगलं करणे म्हणजे दुसऱ्यासाठी त्यागपूर्वक चांगले करणे. योजनापूर्वक, चांगलं करणे. दुसऱ्यासाठी धडपडणं म्हणजे चांगलं करणं. तेच शिव करतो आहे. तुला शिवाचा भक्त व्हायचं आहे, तर तू तसंच चांगलं केलं पाहिजेस. ते केलंस की तुला अमृतानुभव आला आणि शिव आणि तू एक झालास.

स्वामी विज्ञानानंद (अमृतानुभव मधून)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView