एका दगडात शंभर पक्षी!

Date: 
रवि, 5 फेब्रु 2012

समर्थाच्या सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।30।।

मागच्या श्लोकात रामभक्ताच्या शत्रूला राम शासन करतो, असे म्हटले आहे. सुग्रीवाचा कड घेऊन रामाने वालीला शासन केले, तसे ऋषींचे यज्ञही राक्षसांपासून सोडविले. पण पराक्रमी पुरूषाला प्रत्येक वेळीच शस्त्र काही उगारावे लागत नाही. एखाद्या भिंतीवरचे शंभर दगड पाडावयास शंभर बाण मारावे लागतील; पण त्या भिंतीवर पक्षी बसले असतील तर एका बाणाने पक्षी मेल्याबरोबर उरलेले नव्याण्णव उडून जातील. रामबाणाचे असेच दुष्ट-निर्दालनाचे सामर्थ्य एका दुष्टाने अनुभविले, तर उरलेले नव्याण्णव रामभक्ताचे शत्रू रामभक्ताकडे फिरकतही नाहीत.
यालाच उद्देशून श्लोकाचे पहिले दोन चरण दणाणतात, “समर्थाच्या सेवका वक्र पाहे! असा भू-मंडळी कोण आहे!! “ आता रामाचे हे सामर्थ्य कोणाला माहीत आहे का म्हणून विचाराल, तर ते काय हे तिन्ही लोकांत माहीत आहे, असे श्रीरामदास आश्वासन देतात.
कथा अशी आहे की, श्रीशंकराने शतकोटी रामायण तिन्ही लोकांत वाटले. साहजिक रामाचा डंका तिन्हही लोकात गाजतो आहे. तिसऱ्या ओळीतील ‘जयाची’ या शब्दाचा अर्थ विजयाची असा केला तरी चपखल बसतो आणि त्या शब्दाचा अर्थ ‘ज्याची’ असा केला तरी तो सहज संदर्भात योग्य ठरतो.
पहिल्या ओळीतील ‘समर्थाचिया’ चा अर्थसुध्दा श्रीराम या अर्थाने सरळच आहे पण खुद्द त्याचा अर्थ समर्थ रामदास असा द्वयर्थीही घेता येईल. श्रीराम मोठे, तसेच वाल्मिकीही मोठे. त्या मर्यादेत श्रीरामदासही मोठेच. एका कजाग माणसाचा नक्षा उतरवण्यासाठी हाच श्लोक म्हणत, रामदासांचा एक शिष्य त्या कजगाच्या दारात जाऊन उभा राहिला होता. श्रीरामदासशक्तीने आपल्या शिष्याचे रक्षण केले. कसेही असो, भक्तांना रामाचे आणि रामदासांचे दुहेरी रक्षण मिळते, हे चांगलेच आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView