काशीस जावे, नित्य वदावे

Date: 
रवि, 12 ऑक्टो 2014

देहेबुधि हे ज्ञानबोधें तजावी।
विवकें तये वस्तुची भेटि घ्यावी।
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें।
म्हणोनी सदा ते चि शोधीत जावें।।170।।

एका धर्मगुरूच्या शरीरात बाण घुसला. या बाणाला नुसात हात लावल्याबरोबर तो धर्मगुरू वेदनेने ओरडे. वैद्याला तो हातही लावू देईना. बाण शरीरात राहिला तरी शरीर सडून गेले असते आणि काढावा, तर गुरू हातही लावू देईना. शेवटी शिष्य पुढे झाले.

ते वैद्यांना म्हणाले, “संध्याकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली म्हणजे तुम्ही खुशाल तो बाण काढून घ्या. त्यावेळी गुरूंना देहाची आठवणसुध्दा नसते. “ त्याप्रमाणे वैद्याने केले. ते बाण काढू शकले.
देहबुध्दी ही भल्याभल्यांना दु:खाशी जखडून टाकते. यावर उपाय एकच आहे. आणि तो म्हणजे देहबुध्दीच्या मर्यादेचे ज्ञान करून घेणे. श्र्लोकाची पहिली ओळ तेच सांगते. अशा विवेकामुळे त्या वस्तूची म्हणजे आत्म्याची, परमात्म्याची, ब्रह्माची भेट घ्यावी असे दुसरी ओळ सुचविते. तिसरी ओळ सांगते की, अशा प्रकारांनी तन्मय होण्याकडे सहसा आपली वृत्ती नसते.
ह्यावर चौथी ओळ म्हणते की, सदोदित तोच ध्यास घेतला, तोच शोध घेतला म्हणजे आपोआप ते साधेल.

‘काशीस जावे, नित्य वदावे’ ह्यामध्ये मर्म तेच आहे. आयुष्यभर काशीचा ध्यास घेतला म्हणजे आपोआप त्यासाठी पैसा काढून ठेवला जातो. वेळ मनात निश्र्चित केली जात रहाते. प्रवासाच्या कष्टाची मनाने तयारी होते. मनाने ज्याचा ध्यास घेतला, त्याप्रमाणे देह आणि इतर स्थितीही पालटत जाते. याच्या खुणा गेले दोन श्र्लोक सांगत होते. देह आणि मन यांचा संबंध सांगणारा हा एक महत्त्वाचा श्र्लोक आहे.

मनोबोधाचे ओवीरूप
स्त्रियेस अवलोकिलें। वियोगें दु:ख बहुत वाटले।
प्रारब्धसूत्र तुकले। रुणानुबंधाचे।।
कंठ सद्गदित जाला। न संवरेच गहिवरला।
लेंकुरा आणि पित्याला। तडातोडी जाली।।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView