चक्रवाकाचा विरह संपतो तेव्हा -

Date: 
रवि, 25 मार्च 2012

चक्रवाकाचा विरह संपतो तेव्हा -
सदा चक्रवाकसि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामी तैसा।।
करीभक्तिचा घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।37।।
गोष्ट आहे चक्रवाक पक्ष्याची. संध्याकाळ होते आणि नदीच्या दुसऱ्या तीरावर चक्रवाक पक्षी झेप घेतो. दिवसभर चक्रवाक नर आणि मादी बरोबरच फिरत असतात. हा संध्याकाळचा थोडास काय तो विरह कर्तव्यप्राप्त म्हणून बिचारी मादी सोसत बसते. तिला वाटते, आता तिचा पती परत येईलच. तसा तो परत येणारच असतो; पण मध्यंतरात अंधार पडतो आणि चक्रवाक पक्षी वाट चुकतो. मग त्या तीरावरून नर आणि या तीरावरून मादी अशी एकमेकाला साद घालीत बसतात. हे कारूण्याचे काव्य संपते केव्हा? साहजिकच सूर्य उगवतो, तेव्हा पुन्हा दोघे एकमेकाला भेटतात, ते सूर्याच्या आगमनामुळे, प्रकाशामुळे. मार्तंड म्हणजे सूर्य
या श्लोकात सूर्य चक्रवाक पक्षाला कसा सोडवतो, याचा दाखला दिला आहे. (कदाचित् चक्रवाक नर-मादी अध्यात्मातल्या पुरूष-प्रकृतीचे व सूर्य हे ज्ञानाचे प्रतीकही मानता येईल.) छत्तिसाव्या श्लोकापर्यंत श्रीरामाच्या कृपााशक्तीचे निरनिराळे दाखले श्रीरामदासांनी दिले आहेत. या सदतिसाव्या श्लोकात दाखल्याऐवजी उपमा आहे. ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षाला सूर्य सहाय्य करतो, त्याप्रमाणे राम आपल्या भक्तांसाठी संकटात उडी घालतो. तिसऱ्या चरणात म्हणून पुन्हा हरिभक्तीच्या उपायावर जोर दिला आहे. तुम्ही म्हणाल, येथे राम जाऊन हरि कोठून आला? तर रामकृष्णांची एकता आपण दुसऱ्या श्लोकात श्रीरामदासांच्या तोंडून ऐकली आहे. तीच यापुढे सदतिसाव्या श्लोकातही त्यांनी मांडली आहे. मुळात मुद्दा एकनिष्ठेने निशाण जिंकण्याचा आहे. येथे निशाण या शब्दाचा अर्थ निरनिराळ्या अभ्यासकांनी वेगवेगळा सुचवला आहे. निस्साण म्हणून एक नगाऱ्यासारखे वाद्य असावे. तसा अर्थ घेतला, तर नगाऱ्यावर हरिभक्तीची टिपरी वाजत आहे, असा अर्थ येथे होईल. एरवी ‘हरिभक्तीचे निशाण फडकत आहे. ‘असा दुसरा अर्थ होऊ शकेल. पण याहीपेक्षा आणखी सूक्ष्म अर्थ पुढल्या श्लोकाच्या निमित्ताने पाहू.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView