ज्ञानाचे अपूर्व सामर्थ्य

Date: 
रवि, 23 मार्च 2014

म्हणे दास सायास त्याचे करावे।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे।
गुरू अंजनेवीण ते आकळेना।
जुनें ठेवणे मीपणे ते कळेना।।151।।

मागच्या श्र्लोकात जो अनिश्र्चय ओ, त्यावरचा उपाय श्रीरामदास या श्र्लोकात सुचवित आहेत. तीन गुण आणि गुणातीतता यापैकी निवड करण्याचे किंवा त्याबद्दल जागृत राहण्याचे कष्ट, सगळ्यांना जमतील असे नाही. मग आणखी एक उपाय आहे. तो म्हणजे जाणत्याचे पाय धरणे. स्वत: ज्ञान कमवावे, ते जमले नाही तर ज्ञात्याचे ज्ञान तरी करून घ्यावे. ज्ञान मिळविण्यासाठी स्वत:

कष्ट करावयाचे नाहीत, उलट ते ज्ञान आपणाजवळ आहे, असा खोटा भ्रम मात्र बाळगायचा, असे माणूस वागतो. त्याऐवजी जुन्या आणि जाणत्या ज्ञानश्रेष्ठीला शरण जावे. त्याने डोळे उघडले तर आपले भाग्य उजळले असे म्हणावे. तसे म्हणण्यत आपला अहंकार आडवा येऊ देऊ नये. ‘हिपोक्रॅटिस’ हा औषधाचा पिता आणि पॉवलॉव्ह हा आधुनिक मानसशास्त्राचा एक नास्तिक अध्वर्यू. परंतु जवळ जवळ हिपोक्रॅटिसची मानस वर्गीकरणे पॉवलॉव्हने सही सही उचलली. आणि वर खणखणीतपणे सांगितले की, जुन्यातील चांगले घ्यावयास काहीही हरकत नाही.

जे पाश्र्चात्य नास्तिकांना समजते, ते पौर्वात्य आस्तिकांना का समजू नये? वास्तविक, ज्ञानामध्ये आस्तिक-नास्तिक किंवा नवे-जुने, हा संबंध येऊ देण्याचे काहीच कारण नाही. प्रयोगाच्या कसोटीला किंवा अनुभवाच्या कसोटीला जे पटेल, ते पत्करले पाहिजे. ही साधी व्यावहारिक गरज असते. म्हणून या श्र्लोकात श्रीरामदास म्हणत आहेत की, जो कोण जाणता अभ्यासू असेल, त्याच्याकडून ज्ञान घेण्याचे किमान कष्ट मी घ्यावयास हवे. गुरूने डोळ्यात अंजन घातल्याशिवाय दृष्टी स्वच्छ होणार नाही. येथे ‘गुरू’ या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’एवढा भव्य आहे. शीखपंथात आता ग्रंथ हेच गुरू आहेत. वेद निर्माता अज्ञात असल्याने त्याला ईश्र्वरपण देऊन वेदांकडून अनेक पिढ्या शिकल्या. गीतेची साधना शंकराचार्यांनी, आणि ज्ञानेश्र्वरीची साधना एकनाथांनी कर्त्याच्या पश्र्चात् अनेक वर्षानंतर उंच केल्या. जुन्याचे गुरूरूप निरहंकार पत्करण्याची ही उदाहरणे आहेत.

मनोबोधाचे ओवीरूप
वांजपण संदिसें गेलें। तो मरतवांज नांव पडिलें।
तें न फिटे कांही केंलें। तेणें दु:खें आक्रंदती।
आमुची वेली कां खुंटिली। हा हा देवा वृत्ती बुडाली।
कुळस्वामीण कां क्षोभली। विझला कुळदीप।

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView