दोन आख्यायिका

Date: 
रवि, 13 नोव्हें 2011

मना राघवेंवीण आशा नको रें।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे।।
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणें।।18।।
दोन आख्यायिका आहेत. श्री समर्थ एकदा पंढरपूरला गेले. विठ्ठलापुढे येऊन उभे राहिले आणि म्हणू लागले की, “अरे रामा, तू इकडे कोठे येऊन उभा राहिलास? “ श्री रामदासांना सर्व जग राममय होते.
दुसरी आख्यायिका तुकाराम महाराजांची. त्यांना कोणी विचारले की, “वेदात काय लिहिले आहे? “ तुकाराम महाराज म्हणाले, “वेदात लिहिले आहे त्याचा अर्थ इतकाच की, विठ्ठलाला शरण जावे. “
तेच एकाग्रतेचे सूत्र मनाचा अठरावा श्लोक सांगतो. तिसऱ्या ओळीत श्रीरामदास त्या अर्थाने सांगत आहेत की वेदातसुध्दा रामाचेच वर्णन करतात. याला कोणी कालविपर्यास म्हणू नये. मनाची एकाग्रता होते तेव्हा काळ हा अखंड वहात राहतो. आणि मनाच्या श्लोकांचे उद्दिष्टच मुळी मनाला एकाग्रता शिकवणे आहे.
या एकाग्रतेला समर्थ असे माध्यम म्हणजे रामाचे, श्री रामदासांनी पत्करले आहे. म्हणून ते सांगत आहेत की. “राघवाशिवाय म्हणजे या उच्च शक्तीशिवाय कशाची आशा धरू नकोस. कीर्ती गाऊ नकोस. किंवा त्याच्याशिवाय उच्चार करून स्वत:च्या शब्दांना कमीपणा आणू नकोस. “
मानस ज्ञानेश्र्वर
(‘भाग्य स्वप्न मंत्र’ या साधनेसाठी अध्याय 7 श्लो.26ची मंत्रसंलग्न ओवी. लेखकाचे निवेदनातील तळटीपेप्रमाणे.)
ऐसा मी पंडुसुता। अनुस्यूत सदा असता।।
या संसार जो भूतां। तों आनें बोलें।।164।।
अशा प्रकारे, बा अर्जुना, मी सर्व भूतमात्रात अखंड व ओतप्रोत भरलेला असताना, हे जीव ज्या संसारात गुरफटले आहेत, त्या संसाराचे भाष्य निराळेच आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView