भाजीत देव कसा काय असतो?

Date: 
रवि, 11 मार्च 2012

भाजीत देव कसा काय असतो?
असे हा जया अंतरी भाव जैसा।
वसें हो अंतरी देव तैसा।।
अनायास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।35।
तिळाभोवती साखर सतत फिरत राहिली, की सुंदर हलवा तयार होतो. तिळाबरोबर साखर हलवण्याची क्रिया त्यात होते, म्हणून हलवा गोड निर्मितीचे प्रतीक बनतो. मनाभोवती शरीर हलते ठेवले, तर त्यातून असेच गोड कार्य निर्माण होते. गाभ्याला जी शक्ती केंद्रीभूत झालेली असते, त्याप्रमाणे बाहेरची शक्ती चांगली का वाईट, शक्तिमान की दुर्बल हे ठरत असते.
बागवान आपल्या देवासाठी फुलांची आरास करील. वहणांचे दुकान असलेला, वहाणांनी पूजा करील. आणि मांसविक्या मांसाचाच नैवेद्य दाखवील. येथे फूल पुण्य निर्माण करीत नाही, की मांस पाप निर्माण करीत नाही. स्वत: निर्माण केलेली वस्तु स्वत: अर्पण करायची आणि दुसऱ्या दृष्टीने देवरूप मानायची ही युक्ती श्रेष्ठ असते.
यामुळे कर्म, भाव आणि देव यांची एकरूपता साधते. सावता माळी पंंढरपूरला जातच होते पण कर्म करताना हेही म्हणत होते की, “कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. “या युक्तीने दोन्ही बाजूंनी आयुष्य प्रभुमय होते. जरा फुरसत सापडली की तुम्ही प्रत्यक्ष देव-सान्निध्यात जाता! पण कर्म करीत असतानासुध्दा प्रभु या वस्तूत, त्या कर्मात आहेच असे समजता.
या गोष्टीचे कारण असे की, कर्मशून्य काळातील प्रभुमयता आणि कर्मकाळातील कर्ममयता, या दोन्हीचा अनुभव घेणारा ‘भाव’ म्हणजे तुमच्या भावना, तुमचे मन, हा सामान्य घटक आहे. “जैसा तुमचा भाव तैसा तुमचा देव. “म्हणून अनन्य भावाने ज्यांनी श्रध्दा ठेवली, त्यंाची प्रभु रामाने केव्हाही उपेक्षा केली नाही. पुन्हा गीतेमध्ये नवव्या अध्यायातील बाविसावा श्लोक येथे जमून जातो. या श्लोकातील ‘भाव तसा देव’ ही भावना व चौथ्या अध्यायातील अकराव्या श्लोकाची गीतावाणी समतोल राखतात. श्रीरामदासांनी मानसशास्त्रात सर्वव्यापीपणा दाखविताना जणू काही तो समतोल साहजिक रीतीने पुढे केला आहे. मागे चौतिसाव्या श्लोकाच्या शेवटी आपण रामकृष्णांची एकता दाखविली आहेच.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView