भित्या पाठी ब्रह्मराक्षस

Date: 
रवि, 15 जाने 2012

भवाच्या भयें काय भीतोसि लंडी।
धरी रे मना धीर धाकासि सांडि।।
रघूनायका सारिखा स्वामि (स्मामि?) शीरीं।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।27।।
मागल्या श्लोकात, कितीही जपले तरी देहाची स्थित्यंंतरे होतात याची स्पष्टता आली, हे काय माणसांना कळत नाही का? थोड्या विचारवंत माणसाला हे कळल्यावाचून राहात नाही. तरी सुध्दा ‘देह जाईल’ म्हणून तो भीत भीत जन्म घालवतो. गोळ्यांच्या वर्षावाता नेपोलियन युध्द लढे आणि कोणी विचारले तर सांगे, ‘मला मारणारी गोळी अजून कोणत्याही कारखान्यात तयार झालेली नाही. ‘कोणते तरी ध्येय, कोणता तरी निश्चय, कोणते तरी तत्व, कोणती तरी निष्ठा जीवनासमोर असल्याशिवाय ही भीती जात नाही. ती निष्ठा रामापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही, असा भरंवसा या श्लोकात रामदास देत आहेत. ते सांगतात, ‘अरे भित्र्या मना, हा भवसागर तरून कसा जाणार म्हणून तू भितो आहेस? तू धीर धर आणि मनातला धाक सोडून दे. तुझ्या डोक्यात, बुध्दीमध्ये, मनामध्ये रामाचे श्रेष्ठपण सदा बाळग. मग साक्षात् दंडधारी म्हणजे यम आला, तरी त्या संकटातल्या प्रसंगातही राम तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
आता मृत्यू समोर आला म्हणजे राम काय करणार आहे? रामाच्या अंगात मृत्यू टाळण्याचे सामर्थ्य आहे का? खुद्द राम आणि कृष्णासारख्या अवतारांना देह सोडून द्यावा लागल की नाही? मग मृत्यूपासून राम आपल्याला कसा सोडवील? या सगळ्या शंका व्यर्थ आहेत. मृत्यू कोणी टाळू शकत नाही, हे परमसत्य सर्वांना माहीत आहे. किंबहुना मृत्यू ही जन्माइतकीच आवश्यक अशी जीवाची अवस्था आहे, असे ज्ञाते लोक समजतात. त्या मर्यादेत ज्ञानी मनुष्य मृत्यूपासून देहाचे रक्षण करण्याची गोष्ट बोलत नाही तर मृत्यूच्या भयापासून रक्षण करण्याची गोष्ट बोलतो. ज्ञानाने ते भय दूर होते. नेपोलियन निर्भय राहिले म्हणून त्यांच्या अनुयायांनी निर्भयतेने जग जिंकले. मग शौर्य, सत्य आणि त्याग यांचा पुतळा जो राम, त्याच्या उदाहरणाने जीवनातला परमजय मिळेल, यात संशय तो काय?
(श्र्लोकातील ‘लंडी’ या शब्दाचा अर्थ मित्रा असा आहे व ‘दंडधारी’शब्द यमाला संबोधून आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView