मरण्याच्या वेळेला

Date: 
रवि, 18 डिसें 2011

न बोले मना राघवेवीण कांही।
जनीं वाउगे बोलता सूख नाही।।
घडीने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांती तुला कोण सोडूं पहातो।।23।।
बाविसाव्या श्लोकात रामशक्तीचा निश्चय का करावयाचा, हे सांगून झाले. एकदा राममंत्राचे सामर्थ्य समजले, म्हणजे त्यापेक्षा क्षुद्र विचार, क्षुद्र बोलणे, क्षुद्र वस्तु बाळगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून साध्या शब्दांची शक्तीसुध्दा रामशून्य अवस्थेत जाऊ नये, अशी तेथे रामदासांची सांगी आहे.
लोकांशी गप्पागोष्टी बोलण्यात माणसाला मोठी गंमत वाटते. अशा चकाट्यांमध्ये जबाबदारी नसते, निश्चय नसतो, धोरण नसते, ध्येय नसते, आणि म्हणूनच शुध्दी नसते. रामशक्ती घेण्याचा निश्चय झालेल्यांनी हे शब्दांचे बुडबुडे टाळले पाहिजेत, असे दुसरी ओळ सांगते. आता तुम्ही म्हणाल, आजच्या दिवशी चकाट्या पिटू, उद्यापासून रामशक्ती घेऊ तर श्लोकाची तिसरी ओळ सांगते की ते काही होणार नाही. एकदा तुम्हाला रामशक्तीचे ज्ञान झाल्यावरसुध्दा ती तुम्ही वापरणारच नसाल आणि पुढल्या घडीचा हवाला देणार असाल, तर पुढची घडीसुध्दा या घडीला चिकटली आहे ना? ज्ञान प्राप्त झाल्यावर या घडीला तुम्ही जे करता येणार नाही, ते एका घडीच्या आडोशानंतर थोडे दूरच नाही का जाणार?

मग शेवटी चौथी ओळ एकदम देहांताची आठवण करून देते. वर एकविसाव्या श्लोकातील चार टोकांच्या रडारडीचे तेथे स्मरण करून दिले आहे.
मनाचे ‘अभंग’ रूप
हरिनामवेली पावली विस्तार। फळी पुष्पी भार वोल्हावली।।1।। धृ।।
तेथे माझ्या मना होई पक्षिराज। साधावया काज तृप्तीचे या।।2।।
मुळीचिया बीजे दाखविली गोडी। लवकर चि जोडी जालियाची।।3।।
तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ। गोडी ते रसाळ अंतरेल।।4।।
- तुकाराम

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView