माणूस शहाणा की नारळ?

Date: 
रवि, 8 जाने 2012

देहेरक्षणाकारणें येत्न केला।
परी शेवटी काळ घेऊनि गेला।।
करी रे मना भक्ति या राघवाची।
पुढें अंतरी सोडिं चिंता भवाची।।26।।
सुखाच्या पाकात शरीर भिजत घालण्यासाठी आपली तळमळ असते. रेशमी सुखाच्या पकडीत देह लपेटून राहावा, म्हणून मनाचा आकांत असतो. शरीराला जराही ‘जरा’ म्हणजे वृध्दपणा येऊ नये, म्हणून माणूस कोण धडपड करतो! पण हळूहळू तोंडावर वळ्या पडत जातात. त्या तोंडातले दातही पडत जातात. डोळ्याच्या चष्म्याचे क्रमांक वाढत जातात. डोक्यावरचे केसे एक तर पदभ्रष्ट तरी होतात, नाही तर पांढरे फटफटीत पडतात. एवढे करूनही, हा देह हवा असणे, म्हणजे त्याचा हव्यास सुटत नाही. इजिप्तच्या प्रचंड पिरॅमिडस्‌खाली इजिप्तच्या राजांनी आपले देह मरणानंतर औषधी सुगंधांनी टिकवले. एवढे या देहाचे कौतुक! बदामाची बी किंवा नारळसुध्दा आत सुकल्यावर टरफल टाकून देतो. माणूस तेवढेही शहाणपण दाखवत नाही. देहाचे टरफल तो सर्वस्व समजतो. त्याला चिकटून बसण्याचा प्रयत्न करतो.
मग सुख कशात असते! मोठे झाल्यावर तुम्ही बालपणीच्या गोड आठवणी सांगता, आईचे प्रेम आठवता. म्हणजे बालपणीचा देह केव्हाच निघून गेलेला असला तरी रहाते ती नि:स्वार्थ प्रेमाची आठवण. हा जर अनुभव आहे, तर देह गेला किंवा आला, लहान असला किंवा मोठा असला, तरी सर्व काळ, एखाद्या नि:स्वार्थ प्रतीकाची आठवण तुम्हाला सुख देईल, म्हणून श्री रामदास या श्लोकात बजावतात की, तू देहाचा एवढा दास होऊ नकोस; रामदास हो. केव्हा तरी हा देह जाणारच आहे. त्याबरोबर घ्यावयाच्या भवसुखात फार गुंतून पडू नकोस.
मनाचे ‘अभंग’रूप
मना एक करी। म्हणे जाईन पंढरी।
उभा विटेवरी। तो पाहेन सावळा।।1।।धृ।।
करीन संागासी ते काम। जरी जपसी हे नाम।
नित्य वाचे राम। हरि कृष्ट गोविंदा।।2।।
लागे संतांचिया पायां। कथे उल्हास गावया।
आलों मागावया। शरण देई उचित।।3।।
नाचे रंगी वाहे टाळी। होय सादर ते काळी।
तुका म्हणे मळी। सांडूनियां अंतरी।।4।।
-तुकाराम

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView