रागावलेले दोन संत

Date: 
रवि, 1 एप्रिल 2012

रागावलेले दोन संत
मग प्रार्थना तूजला येक आहे।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे।।
अवज्ञा कदा हो येदर्थी न कीज।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।38।।
मागल्या श्लोकात, ‘हरिभक्तीचा निशाणावर घाव घालणे’ याचे दोन रूढार्थ आपण पाहिले. पण एक तिसराच अर्थ अधिक चपखल बसेल, तो या श्लोकांशी जुळेल.
हरिभक्तीचा जो घाव निशाणावर म्हणजेच ध्येयाच्या मुक्कामावर पोचून ध्येय जिंकणे असा अर्थ केला, तर भक्ती हे साधन झाले आणि हरि ध्येय झाले. हरीवर घावासारखा आघात-शब्द कितपत शोभेल? उत्तर इतकेच आहे की, भक्तीत संपूर्ण समर्पणता असेल, तर भक्त आणि देव एकरूप व्हावयाचा असतो. म्हणून त्यात देवाला कमीपणा येण्याचे काहीच कारण नाही. शबरीची बोरे रामाने खाल्ली. तुकारामासारख्यांनी “तुझा संग पुरे, संगती पुरे विठोबा, “ असे देवाला बजावले. पण त्या देवाने तुकारामाला अखेर विमानच पाठविले. तुकारामाचे प्रेमळ अपशब्द हे तात्कालिक आहेत, क्षणिक आहेेेत, आणि शबरीच्या बोरांचे उष्टेपण हे निरागस सहजतेतून आले, हे देव ओळखत होता.
कदाचित त्या क्षणाला शबरी आणि तुकारामाचे धाडस पाहून देव थक्क होऊन गेला असेल.
म्हणून रामदास स्वामींनी या श्लोकात, हरिभक्तीची पातळी कशी असावी ते दिले आहे. ती पातळी देवाला थक्क करणारी असावी. देव काही नुसत्या वरवरया स्तुतीनेच भाळतो असे नाही. भक्ती खरी असली, तर स्तुती वर दिसली नाही तरी चालेल, अशीच त्याची भावना असते. परमशक्ती एकनिष्ठपणाशी कर्तव्यनिष्ठ असते. स्तुती नसते.
नामदेव महाराज असेच एकदा विठोबावर रागावले व म्हणाले, “पतितपावन आहेस म्हणून तुझ्याकडे आलो, पण तसा तू नाहीस म्हणून माघारी जातो. “ आता एवढेच जरी नामदेव महाराजांच्या मनात असते, तरी देवाने काही गैरसमज करून घेतला नसता. पण खुद्द नामदेवांनाच धीर निघेना, शेवटल्याच ओळीत महाराज विरघळले आणि म्हणाले, “तुझं माझं तसं कांही लागत नाही;पण माझ्याबद्दल प्रेम ठेव म्हणून तुझ्या पाया पडतो.
आहे की नाही नमुना? अशा प्रेमळ भक्तांच्याकडे राम थक्क होऊनच पाहणार. प्रत्येकाने आपल्या मनाला रामाची आज्ञा न मोडता त्याच्यापुढे समर्पण करावे. इतके समर्पण की, त्याने राम चकीत होऊन जाईल.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView