सर्वात मोठा चोर

Date: 
रवि, 19 ऑक्टो 2014

असे सार साचार ते चोरलेसे।
येहीं लोचनी पाहतां दृश्य भासे।
निराभास निर्गूण तें आकळेना।
अहंतागुणें कल्पिता ही कळेना।।171।।

मागल्या श्र्लोकात आत्मा, परमात्मा आणि ब्रह्म यांचा शोध घ्यावा असे म्हटले खरे; पण त्यातली अडचणसुध्दा विचारात घ्यावयास हवी. ती घेतली आहे. ती अशी की, सगळ्या जगाचे सार म्हणजे ब्रह्म; ते खरोखरी चोरलेसे म्हणजे गुप्त आहे. कारण दुसरी ओळ सांगते की, इहलोकात डोळ्यांनी पाहता येण्याजोगे दृश्य असेल तेवढ्यानेच आपल्याला ज्ञान होते. तिसरी ओळ स्पष्ट करते की, या दृश्यापलीकडले, ज्याचा भास होत नाही असे, जे निर्गुण, ते काही ध्यानी येत नाही. बरे, ते ध्यानात यावे म्हणून ध्यान धराव, कल्पना करावी आणि ते कल्पनेने जाणावे असे म्हणावे, तर तशी कल्पना करण्याआड अहंकार येऊन उभा राहतो. तसे चौथी ओळ सांगते.

हा अहंकार कसाला? तर दुसऱ्या ओळीत म्हटल्याप्रमाणे, “डोळ्यांनी दिसते, त्याच्या पलीकडे सत्य असू शकत नाही. “ हा अहंकार. यामुळे डोळ्याची प्रतिष्ठा काय वाढेल ती वाढो, पण माणसांची बुध्दीप्रतिष्ठा कमी होते. वास्तविक दृष्टीने रंग म्हणून डोळा जे पाहतो, ती वस्तू नेमकी त्याच्या उलट असते. नेत्रभ्रमाची अनेक मृगजळे विज्ञानात सांगितली आहेत. तरीसुध्दा डोळ्यावर अहंकारी माणसाचा वाजवीपेक्षा विश्र्वास असतो तो असतोच.
ब्रह्मज्ञानाबद्दल अधिक विवचेन एकशेचाळीस ते एकशे पन्नास श्र्लोकांत सांगितले आहे आणि त्याची विविध अंगे एकशे बासष्ट श्र्लोकांपर्यंत आहेत. तेव्हा ज्ञानी माणसाला ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल शंका नाही. पहिल्या ओळीत “चोरलेसे” म्हणजे चोरल्यासारखे असा शब्द सांगितला आहे. त्याचे मर्म पाहण्याजोगे आहे. ब्रह्म हे कोणी चोरून ठेवलेले नाही. चोरी कशाची झाली असेल, तर माणसाच्या ज्ञानाची झाली आहे. आणि ती त्याने स्वत:च केली आहे. हा अंगचोरपणा, ज्ञानाबद्दलचा कंटाळा म्हणजे सर्वात मोठा चोर आहे. दुसऱ्या ओळीतला ‘भासे’ हा शब्द या संदर्भात पाहण्याजोगा आहे, ‘दृश्य दिसते’ हा जसा भास तसाच ब्रह्म चोरले हा भासच, अशी संकुल जुळणी येथे श्रीरामदासांनी मांडली आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView