"विधायक ३१ डिसेंबर" जल्लोषात साजरा

31st December 2016-1-game show
31st December 2016-2-stage show-

३१ डिसेंबर म्हटलं कि डोळ्यांसमोर येते ती उत्स्फूर्तपणे गतवर्षाला निरोप देणारी आणि नव्या जल्लोषात नववर्षाचे स्वागत करणारी तरुणाई. वर्षाची शेवटची रात्र पारा कितीही खाली गेला तरी थंड न होता ऊर्जेने भरून गेलेला असतो आणि याला कुठेही अपवाद नाही, मग ते पुण्यामुंबईसारखी शहरे असोत किंवा छोटेसे गाव असो... तेव्हा खरंच feel the vibes in the air असेच वातावरण असते. हीच ऊर्जा विधायकतेकडे वळवणारा युवक-युवतींमध्ये सध्या असलेला ट्रेंड म्हणजे लोणावळ्याच्या मनःशक्ती प्रयोगकेंद्राचा "विधायक ३१ डिसेंबर" हा कार्यक्रम.

गेली १२ वर्षे नवनवीन थिम घेऊन युवापिढीला हसवत, नाचवत अंतर्मुख करणारा हा कार्यक्रम यंदाच्या आपल्या १३ व्या वर्षात "पाटी फुटली" या थिमसह आला आणि पुन्हा एकदा सर्वांना मंत्रमुग्ध करून गेला. ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजल्यापासूनच तरुणाई मनःशक्तीच्या निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या पायथ्याशी गर्दी करू लागली. आलेल्या तरुणाईला वेगवेगळ्या गटांत विभागले गेले आणि गेम शो ने कार्यक्रमाला सुरुवात झाली. दोन मोठ्या ग्राउंडमध्ये आयोजित केलेल्या या गेम शोमध्ये युवक व युवतींनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. तारुण्याच्या ऊर्जेचे दर्शन घडवणारा हा गेम शो संपवून मग तरुणाई जेवणाच्या दिशेने वळली. लोणावळ्याची ३१ डिसेंबरची रात्र, त्यात खेळल्यामुळे सपाटून लागलेली भूक आणि समोर वाफाळते आणि चविष्ट जेवण... यापुढचे वर्णन काय करावे?

जिभेचे चोचले पुरवून पोटोबा शांत झाले आणि मग सर्वजण स्टेजसमोरच्या मैदानात मुख्य कार्यक्रमासाठी एकत्र आले. ज्याची अत्यंत आतुरतेने सर्वजण वाट पाहत होते तो स्टेजशो सुरु झाला. सर्वप्रथम या वर्षी अनेक मान्यवरांनी जमलेल्या युवा पिढीला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यात सुप्रसिद्ध गायक श्री. महेश काळे, शिक्षणतज्ज्ञ श्रीम. शोभा भागवत, शिक्षणमंत्री मा. श्री. विनोद तावडे, एबीपि माझाचे संपादक श्री. राजीव खांडेकर आणि प्रख्यात अभिनेते श्री. सुनील बर्वे यांचा समावेश होता. यांनतर मनःशक्तीच्या युवासाधक कलाकारांनी स्टेजचा ताबा घेतला आणि एका अविस्मरणीय अनुभवाला सुरुवात झाली.

डब्र्या, पल्लू, अन्या यांनी घेतलेली देसाईची फिरकी असो किंवा शशू ने कुत्र्यावर केलेला क्लोरोफॉर्मचा प्रयोग असो, रानडे सरांचे शब्द असोत किंवा अचानक भेटलेल्या चिलूमुळे शिक्षणात हरवलेले स्वत्व भेटले असो..... एकसो एक गोष्टी आणि या सर्व गोष्टींना एका माळेत गुंफणारे, खूप कमी शब्दात बरंच काही सांगून जाणारे अत्युत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन, केलेले डान्स परफॉर्मन्स... एकामागून एक ह्या गोष्टी येत होत्या आणि प्रत्येक जण त्यात स्वतःला कुठे तरी नव्याने सापडत होता.

शिक्षणाची व्याख्या काय? शिक्षणाचा खरा अर्थ काय? आपले ध्येय कसे असावे, आज शिक्षण आणि ज्ञान यात असलेली तफावत, उपजत कलागुण आणि त्यांची जोपासना, आताच्या विचारी पिढीच्या प्रयत्नांना आवश्यक असलेली दिशा आणि या सर्व शिक्षणापलीकडचे अत्यंत मूलभूत असे हेतूशिक्षण या सगळ्याचा उहापोह अत्यंत सोप्या आणि युवा पिढीला रुचेल अश्या भाषेत करण्यात आला. कार्यक्रम बघताना आलेली तरुणाई जितकं एन्जॉय करत होती तितकंच अंतर्मुख होत होती, स्वतःचं गणित स्वतः मांडत होती आणि बरोबर सोडवतही होती....

रात्री १२ च्या ठोक्याला हा कार्यक्रम सम्पला आणि उपस्थित युवा पिढीने प्रकाशाच्या साक्षीने प्रतिज्ञा घेत नवीन वर्षात प्रवेश केला. मागल्या वर्षीची उजळणी करत, नवीन वर्षाची सुरुवात नवीन आणि चांगले विचार घेऊन युवा पिढीने केली. आपले स्वप्न, आपलं शिक्षण ,करिअर, आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव या सगळ्या विचारांना खतपाणी मिळाल्यामुळे "पाटी फुटली" च्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात "पालवी फुटली" हे मात्र नक्की ......

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView