Weekly Story

Syndicate content

अडथळा फक्त अहंकाराचा

आकशत चांदण्याच्या समुद्रावर नक्षत्राच्या नावा संथ चमचमत होत्या. आकाशातून शुध्द, पवित्र, तेजधारा वाहतात. त्याची पतरफेड कृतघ्न माणसे स्वार्थाचे धूर पृथ्वीवरून आकाशाकडे लोटण्याचे काम करीत राहतात.
अर्थात् पृथ्वीवर शुभतेचे अपवाद नसतात, असे नाही. चंद्रासारखे शांत आणि शीतल वसिष्ठ मुनी, चांदण्यात बसले होते. तेव्हा अरुंधती विचार करीत होती की वशिष्ठांचा चारित्र्यचंद्र अधिक उज्ज्वळ की आकाशातला!
पुण्यामागे पाप हात धुवून का लागते हे समजत नाही. बहुधा पुण्याची परीक्षा पाहण्यासाठी पापाचे पंजे तपकर्त्याला बोचकारत राहतात. तसेच विश्र्वामित्राचे पंजे वशिष्ठांच्या द्वेषाने गेली कित्येक वर्षे परजले होते. वशिष्ठांच्या पुत्रांना या पंज्याने ठार केले होते. वशिष्ठाला सर्व बाजूंनी दु:खी करणे, हेच जणु विश्र्वामित्राच्या जगण्याचे सारसर्वस्व राहिले होते. पण मारण्याचा पराक्रम माणसाला फारतर ‘राजर्षी’ करू शकेल. ‘ब्रह्मर्षी’ होण्यासाठी त्याला तारण्याचा पराक्रमच करावा लागतो.
उध्वस्त संसार झालेली अरुंधती, वशिष्ठांच्या शांतीप्रतीकामुळेच शांत होती.
बाजूला पसरलेले पौर्णिमेचे पिठूर चांदणे पाहून ती हळुवारपणाने म्हणाली, “किती छान पडलं आहे नाही चांदणे! “
वशिष्ठांच्या पर्णकुटीमागे, विश्र्वामित्र परजता परशु घेऊन उभा होता. काही क्षणातच पुढे होऊन तो वशिष्ठांचे तुकडे करणार होता. त्याच्या भडकलेल्या द्वेषाग्नीमध्ये आज अखेरची आहुती पडायची होती. चकाकत्या चांदण्याला द्वेषाचा रक्तमय काळोख फासला जायचा होता. अरुंधतीचे चांदण्याच्या प्रशंसेचे सुखसुध्दा विश्र्वामित्राला सहन झाले नाही. दुसऱ्याचे कोणतेही सुख सहन करण्याच्या अवस्थेत द्वेष नसतो.
अरुंधतीने वशिष्ठांचे लक्ष चांदण्याकडे वेधवले तेव्हा वशिष्ठ कुठल्यातरी गूढ तंद्रीत होते. पण पत्नीचे उद्‌गार त्यांनी ऐकले होते. मग गालावरच्या केसावर हात फिरवत ते म्हणाले, “अरुंधती, या चांदण्याला उपमा एकच. विश्र्वामित्राच्या अथंाग सुंदर तपश्चर्येची! “
मागल्या अंधारातून परशु खाली आला. तो परशु धरणारा हात थबकती पावले पुढे ढकलून जलदीने पुढे आला. परशु वशिष्ठांच्या पायाशी नमला. विश्र्वामित्रांनी जोडलेल्या हातांनी वशिष्ठांना विनविले, “मुनीवर्य, मला क्षमा करा. मी आज तुम्हाला या परशुने मारणार होतो. मी तुम्हाला सतत पीडा देत आलो. तुमच्यात नसलेले दोष पहात आलो आणि तुम्ही मात्र माझ्यात नसलेले गुण मोठे करत आलात. माझे डोळे उघडले. मला क्षमा करा. “
पायाशी आलेल्या पुण्यवानाला पोटाशी उचलत वशिष्ठ म्हणाले, “ ब्रह्मर्षे! उठा, तुमचे मंगल राहो. “
‘ब्रह्मर्षे’ हा शब्द ऐकल्यावर विश्र्वामित्र अधिकच लाजला. जी पदवी मिळविण्यासाठी विश्र्वामित्राने हत्यार उगारले होते, तिला आजवर खरा अडथळा स्वत:च्या अहंकाराचा होता, हे सत्य शापित विश्र्वामित्राच्या लक्षात आले.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView